एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन; मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली
चेन्नई : मनोरंजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गायक एसपी बालासुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. बालासुब्रमण्यम गुरुवारी लाइफ सपोर्टवर आहेत अशी माहिती रुग्णालयाने दिली होती.
मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली आहे. आणि देश आज एक दिग्गज गायकाला मुकला आहे. चैन्नईमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी अधिकृत माहिती दिली. शुक्रवारी 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची बातमी चरण यांनी दिली. ते 74 वर्षांचे होते. एसपी चरण यांनी डॉक्टर, हितचिंतक आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाचं निदान झालं होतं. 5 ऑगस्टला त्यांना एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपला व्हिडीओ जारी केला होता आणि आपण बरं असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती.
त्यांच्या आजारपणाबद्दल समजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यात आली होती. अनेकांनी त्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. देशभरातील अनेक दिग्गजांनी देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. मात्र त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दाक्षिणात्य सिनेमांतील संगितामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा होता. अभिनेता कमल हसन आणि अन्य काही अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली होती. गुरुवारी अभिनेता कमल हसन यांनी त्यांच्या या गायक मित्राची हॉस्पीटलमध्ये जाऊन भेट देखील घेतली होती.
काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली. त्यांचा मुलगा एसपी चरण यांनीदेखील 19 सप्टेंबरला आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करत आपल्या वडिलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. माझे वडील आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आणि इतर पॅरामीटर्सही नॉर्मल आहेत. आता ते पूर्णपणे ठिक आहे. लवकरात लवकरत त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी आशा आम्हाला आहे.
त्यांना कोणतंही संक्रमण नाही. मात्र फुफ्फुस, श्वासोच्छवास आणि शारीरिक शक्ती यामध्ये अजून सुधारणा होण्याची गरज आहे”, असं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं होतं. 24 सप्टेंबरला हॉस्पिटलने जारीकेलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये असे सांगण्यात आले होते की गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती ढासळते आहे. त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे, त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.