डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटावर राज ठाकरेंनी केला कौतुकाचा वर्षाव

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्य आणि कला प्रेम सर्वश्रूत आहे. अनेकदा मराठी सिनेमा आणि नाटकांबद्दल ते मनमोकळे पणाने बोलत असतात. थिएटरमध्ये मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळत नव्हता तेव्हा मनसेनं आवाज उचलला होता. मराठी असो वा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री अनेक कलाकारांशी राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत.

राजकारणाव्यतिरिक्त पुस्तक वाचन, सिनेमा पाहणे, विविध विषयांवर चर्चा करणे हा राज ठाकरेंचा छंद आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरु झालं, कोणालाही घराबाहेर पडता येत नव्हतं, अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता सगळ्यांनाच घरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता, या लॉकडाऊन काळात अनेकांनी आपापले जुने छंद जोपासले. अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरु झाली असली तरी सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांना बाहेर पडणंही शक्य झालं नाही.

या वेळेचा उपयोग साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा पाहिला. याबद्दल राज ठाकरेंनी लिहिलंय की, डॉ. काशिनाथ घाणेकर हा सिनेमा जरी २०१८ मध्ये रिलीज झाला असला तरी माझा पाहायचा राहून गेला होता. बाहेर प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे बाहेर पडणं शक्यच नाही, त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत तो बघून संपवला.

एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम सिनेमा, कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले आणि अर्थात दिग्दर्शन पण, भालजी पेंढारकर सोडले तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येकाला भेटण्याचा योग मला आला होता आणि व्यंगचित्रकार असल्यामुळे प्रत्येकाच्या लकबी मी तेव्हा हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम पाहताना जाणवलं की, ह्या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहे. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरचं सगळ्यांचे अभिनय, कडक! अशा शब्दात राज ठाकरे यांनी सिनेमाचं कौतुक केले आहे.

त्याचसोबत सिनेमात दाखवलेला काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता, कोरोनात्तर काळात पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे, आणि नटांच्या संहितेच्या जोरावर तसेच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसांच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक कायमचे लागू देत असा विश्वासही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

अबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*