रियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी २९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे रियाचा भायखाळा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार होती. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आजही रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. हायकोर्टाने ती २९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे रियाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून तिचा आणि तिच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. नोर्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) ८ सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिला एनडीपीसी कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी तिची कोठडीची मुदत संपणार असल्याने जामिनासाठी रिया आणि तिच्या भावाने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांची कोठडी ६ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. त्यामुळे सुनावणी २९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
दीपिका, रकुलची आज चौकशी
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोणसह सारा अली खान, श्रद्धा कपूर, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा, रकुलप्रीत सिंह यांना काल समन्स बजावले होते. त्यानुसार आज फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांची चार तास चौकशी केली. शुक्रवारी दीपिका पदुकोण आणि रकुलप्रीत सिंह यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे दीपिका गुरुवारी गोव्यातून मुंबईत दाखल झाली. तसेच सारा अली खानही आई अमृता सिंह हिच्यासह गोव्यातून मुंबईत दाखल झाली आहे. सुशांतसिंह राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी साराची चौकशी करण्यात येणार आहे.