‘या’ महिला आयपीएसमुळे खाकीचा अभिमान वाढला!

आपल्याला पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या शौर्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या शौर्याची प्रचीती आपण अनेकदा पाहिली अनुभवली असेल . त्यावेळी जेवढे धाडस पोलीस खात्यातील पुरुष कर्मचाऱ्यांनी दाखवले, तेवढेच धाडस स्त्री कर्मचाऱ्यांनी देखील दाखवले.

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने चालत आहे, असेच काहीसे या पोलीस खात्यामध्ये देखील आपल्याला दिसून येते. या खात्यामध्ये अश्या कितीतरी स्त्रियांचा समावेश आहे, ज्यांनी मोठमोठी कार्य शत्रूला न जुमानता स्वबळावर पार पडली आहेत. आज आपण अश्याच काहीशा धाडसी स्त्री पोलिसांची माहिती जाणून घेणार आहोत…

किरण बेदी

आपल्या निर्भय आणि नम्र स्वभावासाठी परिचित असणाऱ्या किरण बेदी 1972 च्या बॅचचा आयपीएस अधिकारी आहेत. 2007 मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. सध्या त्या पुदुच्चेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून काम पाहतात. तिहार कारागृहात झालेल्या व्यापक सुधारणांसाठी त्या ओळखल्या जातात. आपल्या अतुलनीय कार्यामुळे त्यांनी रॅमन मॅग्सेसेसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

अर्चना रामासुंदरम

अर्चना या 1980 बॅचच्या तामिळनाडू केडरच्या आयपीएस अधिकारी आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी ओळखल्या जाणार्‍या अर्चना यांना आपल्या कामगिरीसाठी 1995 मध्ये पोलिस पदक देण्यात आले होते.

मीरा बोरवणकर

मीरा बोरवणकर या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. त्या 1981 साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सीआयडी आणि सीबीआयसारख्या गुप्तचर शाखांमध्ये दीर्घ काळ कार्यरत असलेल्या मीरा यांना 1997 मध्ये राष्ट्रपती पदक देण्यात आले होते. या अगोदर त्यांना पोलिस पदक आणि पोलिस महासंचालक पदकही मिळाले आहे.

संजुक्ता पराशर

आसामची आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजुक्ता पारशर या 2006 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. आसाममधील बोडो आणि बांगलादेशी घुसखोरांमधील संघर्षावर त्यांच्या धाडसी कामगिरीची संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरु असते. मात्र आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, त्यांनी कर्तव्यात कधीही कसूर सोडली नाही.

सोनिया नारंग

सोनिया नारंग कर्नाटक कॅडरच्या 2002 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 1999 मध्ये पंजाब विद्यापीठातून समाजशास्त्रातील गोल्ड मेडल मिळवले. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी होते. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा स्वभाव आणि त्यांच्या कामातील एकाग्रता यांमुळे त्या ओळखल्या जातात.

कंचन चौधरी भट्टाचार्य

कंचन चौधरी भट्टाचार्य या देशातील पहिली महिला डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (डीजीपी) आहेत. भारताच्या दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. 1989 मध्ये त्यांचा दीर्घ आणि गुणवंत सेवांसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मान करण्यात आला होता. 31 ऑक्टोबर 2007 रोजी त्या पोलिस सेवेतून निवृत्त झाल्या.

डॉ. बी. संध्या

डॉ. बी. संध्या या केरळ येथील अतिरिक्त पोलिस महासंचालकआहेत. केरळच्या हाय प्रोफाइल प्रकरणांच्या तपासणीसाठी त्या ओळखल्या जातात. 2006 मध्ये राष्ट्रपती पदक मिळण्याव्यतिरिक्त, प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

विमला मेहरा

विमला मेहरा या देशातील पहिली महिला विशेष आयुक्त असून दिल्ली पोलिसांच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलिस आयुक्त (प्रशासन) या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. तिहार तुरूंगात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आणि 1091 हि हेल्प लाइन सुरू करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. हल्ली दिल्लीतील महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे.

छाया शर्मा

देशाला हादरवून देणाऱ्या निर्भया प्रकरणाच्या चौकशीत दिल्ली पोलिस अधिकारी छाया शर्मा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. छाया शर्मा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात (एनएचआरसी) डीआयजी म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना 2019 च्या मॅककेन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल लीडरशिप अवॉर्डने गौरविण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*