विधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

आघाडी सरकारने 12 आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले.

त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मार्शलने केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला.

भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते.

चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील आजूबाजूलाच बसले होते. यावेळी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांना अभिरुपी विधानसभाचे अध्यक्ष करण्यात आले.

त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी काल झालेला प्रकार या अभिरुप विधानसभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. तसेच सरकारच्या निषेधाचा आणि धिक्काराचा प्रस्ताव मांडला.

You might also like
Leave a comment