वैदिक संस्कृती : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके

भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला वैदिक संस्कृती’ असे म्हणतात.

वैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाङ्मय. इतके प्राचीन, विपुल आणि विविध प्रकारचे वाङ्मय इतरत्र क्वचितच पाहायला मिळते. फार प्राचीन काळापासून वैदिक काळातील लोकांनी संस्कृत भाषेत सुंदर अशी काव्यनिर्मिती केली.
ऋग्वेद हा त्यांचा पहिला ग्रंथ होय. ऋग्वेदानंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे तीन वेद रचले गेले. त्यानंतरच्या काळात ब्राह्मणग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना झाली.

ऋग्वेद

ऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. त्यामध्ये केलेले निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कड़व्यास ‘ऋचा‘ असे म्हणतात.

यजुर्वेद

यजुर्वेद हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. यज्ञात वापरायचे मंत्र आणि त्या मंत्रांची गढ्यात केलेली स्पष्टीकरणे त्यात आढळतात.

सामवेद

ऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदात केलेले आहे. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो.

अथर्ववेद

अथर्ववेदाचे स्वरूप वर उल्लेखलेल्या वेदांपेक्षा निराळे आहे. त्यात तत्त्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे, पीडा यांवर उपाय सांगितले आहेत. औषधी वनस्पतींची माहितीही अथर्ववेदात दिलेली आहे.

ब्राह्मणग्रंथ

ब्राह्मणग्रंथाची रचना ही यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, हे स्पष्ट करण्यासाठी झाली.

आरण्यके

आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ. दैनंदिन जीवनापासून दूर अरण्यात जाऊन चिंतन करण्याची परंपरा भारतात फार पूर्वीपासून चालत आली आहे. या परंपरेचा पाया आरण्यके रचणा-या प्राचीन ऋषिमुनींनी घातला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*