त्वचेच्या सौंदर्यासाठी काय करता येईल?
त्वचेवर येणारे डाग लपविण्यासाठी कुणालाही नकोसेच असतात. मग ते लपवण्यासाठी महागड्या ब्युटी थेरपीज किंवा सौंदर्यप्रसाधनांचा सातत्याने वापर केला जातो.
मात्र त्याचा फार काही फायदा होत नसल्याचे कालांतराने लक्षात येते. अशात त्वचेवरील डाग कायमस्वरूपी जाऊन ते पुन्हा न उद्भविण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक ठरते. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील.
त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, त्वचा नितळ, सुंदर बनविण्यासाठी आपण पीत असलेल्या पाण्यामध्ये काही पदार्थ समाविष्ट केल्याने शरीरामध्ये साठून राहिलेले घातक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. हे पाणी निरनिराळे पदार्थ वापरून तयार करता येते. यालाच ‘इन्फ्युज्ड वॉटर’ ही म्हटले जाते. हे इन्फ्युज्ड वॉटर तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती जाणून घेऊया…
पिण्याच्या पाण्यामध्ये चिमुटभर दालचिनी पूड आणि सफरचंदाचे काही तुकडे घालून हे पाणी उकळावे. काही मिनिटे हे पाणी उकळून मग ते थंड होऊ द्यावे. हे पाणी गाळून घेऊन याचे सेवन करावे. चवीला हे पाणी अतिशय चविष्ट लागतेच, पण त्या शिवाय या पाण्यामुळे शरीरातील घातक द्रव्ये बाहेर पडण्यासही मदत होते, व शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
पिण्याच्या पाण्यामध्ये थोडा स्ट्रॉबेरीचा रस मिसळल्याने त्वचेला याचा फायदा होतो. हा रस ताज्या फळांचा असावा. प्री-पॅकेज्ड रसाचा वापर करू नये. स्ट्रॉबेरीमध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये असून, यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात.
सकाळी गरम पाण्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि मध घालून या पाण्याचे सेवन करणेही त्वचेसाठी उत्तम मानले जाते. त्वचेवर येणाऱ्या मुरुमे पुटकुळ्यांसाठी जवाबदार असणारे जीवाणू नष्ट करण्यास मध सहायक असते. तुळशीच्या बियांप्रमाणे दिसणाऱ्या ‘चिया सीड्स’मध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये ओमेगा थ्री देखील मुबलक मात्रेमध्ये आहेत. यामुळे त्वचा तजेलदार दिसू लागते. एक चमचा चिया सीड्स एक ग्लास पाण्यामध्ये दोन तास भिजवून ठेवून या पाण्याचे दररोज सेवन करावे.
एक लिटर पाण्यामध्ये काही पुदिन्याची पाने, दोन तीन लिंबाच्या चकत्या आणि अर्ध्या काकडीच्या चकत्या घालून हे पाणी रात्रभर झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी या पाण्याचे सेवन करावे. या पाण्यामुळे शरीरातील उष्णता दूर होण्यासही मदत मिळते, पचनक्रिया सुधारते व त्वचेचे आरोग्यही सुधारते.
दररोज सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये दोन मोठे चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घातल्याने पचनक्रिया सुधारते व शरीरातील विषारी घटक घामावाटे बाहेर पडण्यास मदत होते.