आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक
जन्म : 7 सप्टेंबर 1791
(भिवडी, पुरंदर, पुणे)
फाशी : 3 फेब्रुवारी 1832
(पुणे)
सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साता-याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशाची जास्त दहशत होती.
सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबुर्ड्याचा लष्करी खजिना 1924 – 25 साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.
सत्तू नाईक नंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईकवडे आले. भूजाजी, कृष्णाजी, येसाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू सरदार होते. उमाजी स्वत: ला राजे समजून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी 1791 साली उमाजीचा जन्म झाला होता.
◾️ब्रिटिश काळात रामोशांची संख्या 18000 होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसात दहशत पसरवली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी 1826 साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणा-यास 100 रुपये ईनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
◾️सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून ईनामाची रक्कम 1200 रूपये कली आणि जाहीरनाम्यात असे म्हटले की, “सरकारला मदत केली नाही तर बंडवाल्यात सामिल झालात, असे समजण्यात येईल.” यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणा-या शिवनाक यास रामोशांनी ठार केले.
◾️त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच . डी . रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गददारी न केल्यामुळे त्याच्या हाती काहीच आले नाही.
◾️रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्याठी बंडखोरांची माहिती देणा-यासाठी खास बक्षिस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्हयातील लोकांनी ब्रिटिशांकडे महसूल न भरता उमाजीकडे दयावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील 13 गावानी उमाजीकडे महसुल भरला.
◾️शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्हयात शांतता व सुव्यवरथा राखण्याचे काम उमाजींकडे देण्यात आले. पण पुढे नंतर 13 गावांच्या महसुलावरुन उमाजी व ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला.
◾️1831 साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिध्द करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली. उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणा-यास 5000 रूपये व 2 बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकटया उमाजीस पकडून देणा-यास 2500 रूपये व 1 बिघा जमीन जाहीर करण्यात आली. बक्षीसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी, नाना रामोशी यानी गददारी केली. उमाजीचा जुना शत्रु बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. 15 डिसेंबर 1831 रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. पुण्याच्या तहसिलदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 रोजी उमाजीला फाशी देण्यात आली. त्याठिकाणी आता पुतळा स्वातंत्र्याचा संदेश देत ठामपणे उभा आहे.
◾️उमाजीचा पहिला चरित्रकार व उमाजीस पकडण्याच्या मोहीमेचा प्रमुख मैकिन्तोश म्हणतो, “उमाजीच्या नजरेसमोर शिवाजी राजांचे उदाहरण होते. स्वराज्य संस्थापक शिवाजी हे त्याचे श्रध्देय व स्फूर्तीचे स्थान होते. शिवाजीच त्याचा आदर्श होता. मोठमोठया लोकांनी मला स्वतः सांगितले की, उमाजी हा काही असला तसला भटक्या दरोडेखोर नाही. त्याच्या नजरेसमोर नेहमी शिवाजीचे उदाहरण होते. शिवाजी महाराजांप्रमाणे आपण मोठे राज्य कमवावे अशी त्याची इच्छा होती.”