उषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची घोषणा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज ही घोषणा केली. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने एकमताने निवड केली आहे.उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा, जय संतोषी मॉं, आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इन्कार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. तसेच असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी उषातार्इंचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकारास राज्य शासनातर्फे सन १९९२ पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते. संगीतकार राम-लक्ष्मण, उषा खन्ना, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका सुमन कल्याणपूर, आशा भोसले, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*