आजपासून तुळशी विवाहास प्रारंभ; जाणून घ्या शुभ मुहूर्त
दिवाळी नंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. यंदा आजपासून ते सोमवार दि. 30 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. या निमित्ताने आज याबाबत सर्व काही जाणून घेऊयात…
तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत करण्यात येतो. यामध्ये विष्णूचा तुळशीशी विवाह लावला जातो. भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय असून तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.
तुळशी विवाह 2020 शुभ मुहूर्त
आज 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.59 ते 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.59 पर्यंत तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे.
तुळशी विवाहाचे स्वरूप :
- या दिवशी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करून त्यामध्ये बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात, ठेवतात.
- या नंतर घरातील कर्ती व्यक्ती तुळस तसेच श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना हळद व तेल लावून स्नान घालतो.
- या नंतर विष्णूला जागे करून बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.
- तुळशीचे कन्यादान करावे. नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे.
गोव्यातील उत्सव
गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन 2017 मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले होते.
तुळशी विवाह परंपरा व उद्देश :
- हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून खूप महत्व आहे तसेच भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी ही वनस्पती आहे.
- तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.
- विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी किंवा मुख्यत: द्वादशीला करतात.