साहित्य क्षेत्रातील ‘अमृतसिद्धी’ म्हणजे पु.ल.देशपांडे

जगभरातील मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल.देशपांडे. यांची आज (8 नोव्हेंबर) जयंती. याच पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाविषयी काही गोष्टी.

पु.ल.देशपांडे. पुल बहुरूपी होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या. त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी त्यांची गती या सर्व क्षेत्रात सारखी होती.

‘गुळाचा गणपती’ या ‘सबकुछ पु.ल.’ म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते. पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले.

पु.ल.देशपांडे यांच्याविषयी

मुंबईत जन्मलेले पुलं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. 40 च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले.

आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 हून अधिक आवृत्या खपल्या. पूर्वरग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा, वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत.

वार्‍यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी त्यांची ही नाटके अतिशय गाजली. याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत.

गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम.

पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की ‘किती घेशील दो कराने’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.

Leave a comment