चाबहार रेल्वे प्रकल्प – Chabahar Rail Project

मराठीत

चर्चेत का?

इराणने चाबहार रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याच्या व प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्याच्या कार्यात भारत विलंब लावत असल्याचे कारण देऊन आता स्वतःच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे.

इराणने 628 कि.मी. असलेल्या चाबहार ते झाहेदन रेल्वे मार्गाचे Track-Laying कार्यास सुरूवात केली असून हा मार्ग अफगाणिस्तानच्या सीमेवरील झरंजपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

हा संपूर्ण प्रकल्प मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून Iranian National Development Fund मधून 400 मिलीयन डॉलर Iranian Railways वापरणार आहे.

चाबहार रेल्वे प्रकल्पाचे महत्व

चाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे.  चाबहारचा इतिहास खिस्तपूर्व 2500 वर्षापासूनचा असून अलेक्झांडर, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती.

भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्या मध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्वाची भूमीका बजावणार होता, अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतामध्ये चाबहार पर्यंत रेल्वेमार्ग बांधण्याची योजना होती याद्वारे अफगाणिस्तान सोबतही भारताचा व्यापार वाढणार होता.

पार्श्वभूमी

चाबहार, काबुल, भारत नकाशा

मे 2016 मध्ये भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाली होती ज्यामध्ये इराणमधील चाबहार बंदर वापरण्याबाबत तीन देशांमध्ये समुद्र वाहतुकीसाठी एक प्रादेशिक केंद्र म्हणून Transit & Transport Corridor ची स्थापना करण्यात आली.

अफगाणिस्तान आणि मध्य आशियाला वैकल्पिक व्यापार मार्ग म्हणून अफगाणिस्तानच्या सीमेसहचाबहार बंदर ते झाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बांधणे हा देखील त्याचाच एक भाग होता.

भारत सरकारच्या मालकीची Indian Railways Construction Ltd (IRCON) & Iranian Railway Ministry यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता.

चाबहार बंदर

चाबहार बंदर ओमानच्या आखात जवळ (Gulf of Oman) असून चीन विकसित करत असलेल्या ग्वादर बंदरापासून अवघ्या 72 किमी अंतरावर आहे.

चाबहार मधे शहीद कलंतरी आणि शहिद बेहेश्ती अशी दोन बंदरे आहेत आणि दोहोंमध्ये
प्रत्येकी पाच धक्के असतील.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) आणि जहाजबांधणी मंत्रालय येथे दाने शिपिंग कंटेनर बर्थ बांधत आहेत. या बर्थची लांबी 640 मी. असेल तसेच तीन मल्टी कार्गो बर्थसाठी 8.5 कोटी डॉलरर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.

इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही चाबहारमुळे सोपा होणार, चाबहार बंदाराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपूर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार.

अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा अडथळा दूर होऊन रशिया, मध्य आशियातील उझबेकीस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत पोहोचू शकेल.

ग्वादार बंदर, गवादर बंदर

ग्वादार बंदर

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादार हे अरबी समुद्रातील एक महत्वाचे बंदर आहे या बंदराच्या विकासासाठी पाकिस्तानने 2002 मध्ये चीनबरोबर करार केला. त्यातुन चीनला अरबी समुद्रामार्फत आखाती देश व आफ्रीकन देशांशी वाहतुकीचा जवळचा मार्ग उपलब्ध झाला.

2015 मध्ये चीन-पा ये किस्तान आर्थिक कॉरिडॉर या महत्वकांक्षी प्रकल्पाची सुरूवात झाली त्यातुन पाकिस्तानला मध्य आशियातील देशांशी वाहतुकीचा मार्गसुलभ होणार आहे.

ग्वादर ते कारागरला जोडणारा हा महामार्ग असणार आहे. काराकोरम महामार्ग आणि ग्वादर बंदराच्या फेरविकासाचाही यात समावेश आहे.

चीन-इराण करार (जुलै 2020)

चीन इराण करार

चीन-इराणमध्ये 400 अब्ज डॉलरचा तेल आणि शस्त्रांचा करार झाला. या दोन देशांमध्ये 25 वर्षांसाठी तेल व्यापाराचा करार झाला आहे.

इराण चीनकडून आधुनिक शस्त्रांची खरेदी करणार तसेच चीन इराणमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे.

चीन आणि इराणचे सैनीक नियमितपणे संयुक्त युद्ध सराव करणार असून गोपणीय माहितीचे हस्तांतर, दहशतवाद विरोधी कारवाई या कामात चीन आणि इराण एकमेकांना सहकार्य करणार आहेत. या करारामुळे आशिया खंडातील शस्त्रास्त्र स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

परिणाम

  • चीन-इराण करारामुळे भारताचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारताने इराणच्या चाबहार बंदराचा वापर करण्यासाठी इराण सरकारसोबत करार केला होता.
  • इराणकडून मर्यादित प्रमाणात भारत तेल आणि वायू यांची खरेदी करत होता. चीन आणि इराणच्या कराराचे स्वरूप बघता भारताला चाबहार बंदरातून अपेक्षित लाभ होणार नाही.
  • चीन विरोधी असलेल्या गटासोबत सहकार्य करार करून भारत विरोधी गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल.

Input by : अभिजीत राठोड