या टॉप 6 फलंदाजांचे रेकॉर्ड मोडणे अशक्य!

क्रिकेट खेळाडू

विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विलियम्सन, जो रूट, रोहित शर्मा आणि बाबर आझम… जगातील या सहा टॉप फलंदांजांनी अनेक अविश्वसनीय विक्रमांची नोंद केली आहे. पण, या प्रत्येकानं स्वतःच्या नावावर एक असा विक्रम नोंदवला आहे की तो मोडणं अवघड आहे.

विराट कोहली

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या घडीचा आघाडीचा फलंदाज. भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहलीची प्रत्येक खेळी ही विक्रमाला गवसणी घालणारी असते. सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम विराट कोहली मोडेल असा अनेकांना विश्वास वाटतोय. २०१६-१७ मध्ये चार सलग कसोटी सामन्यांत चार द्विशतकं झळकावण्याचा विक्रम त्यानं नावावर केला होता. त्याचा हा विक्रम मोडणे शक्य नाही.

स्टीव्ह स्मिथ

स्टीव्ह स्मिथनं १२६ कसोटी डावांत ७००० धावा पूर्ण केल्या. ६० पेक्षा अधिकच्या सरासरीनं कसोटीत ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. शिवाय ७३ वर्षांच्या इतिहासात सर्वात जलद हा पल्ला सर करणारा फलंदाज आहे. स्मिथनं आतापर्यंत ७७ कसोटीत ६२च्या सरासरीनं ७५४० धावा केल्या आहेत.

केन विलियम्सन

मिस्टर कूल या नावानं न्यूझीलंडचा कर्णधार ओळखला जातो. २०१६ मध्ये त्यानं एक मोठा विक्रम नावावर केला. कसोटी खेळणाऱ्या ९ विविध संघांविरुद्ध शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. त्यानं २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावून हा विक्रम केला. २६व्या वर्षी त्यानं हा पराक्रम केला.

जो रूट

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटला एक वेगळं वळण देणारा कर्णधार. २०१७मध्ये त्यानं कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानं परदेशात सलग पाच कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं श्रीलंकेला २०१८ मध्ये ३-० व २०२१मध्ये २-० असे पराभूत केले. नुकत्याच केलेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्यानं पहिल्या कसोटीत २२८ आणि दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या. त्यानंतर भारतात दाखल होताच पहिल्या कसोटीत २१८ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांत १५०+ धावा करणारा तो पहिला कसोटी कर्णधार ठरला.

रोहित शर्मा

भारतीय संघाचा वन डे , ट्वेंटी-२० व कसोटी संघाचा सलामीवीर रोहित शर्मा यापूर्वी मधल्या फळीत खेळायचा. पण, तो सलामीला येऊ लागला अन् विक्रमांचा पाऊस पाडू लागला. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १५३ चेंडूंत ३३ चौकार व ९ षटकारासह २६४ धावांची खेळी केली. वन डे क्रिकेटमध्ये २६४ धावांच्या सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडणे अवघड आहे.

बाबर आझम

पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबरची सातत्यानं विराटशी तुलना केली जातेय. सर्व फॉरमॅटमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्यानं २५ डावांत १३०६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्ये त्यानं विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत ३६० धावा केल्या होत्या. एका मालिकेतील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*