दिवाळीत ‘या’ वस्तूंनी सजवा आपले घर
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक लोक घराची साफ-सफाई करून घर सजवण्याची तयारी सुरू केली आहे. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणरायाची पुजा केली जाते. घरात फराळाच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. अशा उत्साहपूर्ण वातावरणात घराच्या सजावटीकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो.
दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर सुंदर तोरणं लावलेली दिसतात. खरं तर दिवाळीच्या सजावटीची सुरुवात मुख्य दरवाजापासून होत असते. त्यात वरती फुलं आणि आंब्याची, अशोक वृक्षाच्या पानांनी तयार केलेले तोरण लावले जाते. बाजारामध्ये खऱ्या फुलांच्या तोरणांसोबतच खोट्या फुलांची तोरणही असतात. याव्यतिरिक्त बाजारात तयार केलेली फॅन्सी म्हणजेच, पेपर, फॅब्रिक, बिट्स आणि शंखांची तोरणं सहज उपलब्ध आहेत.
बाजारात बारीक दिव्यांची म्युझिकल तोरणं खूप आहेत. त्या दिव्यांभोवती, फुलं, पानं, फुलपाखरं, कलश असे कित्येक दिवे आले आहेत. त्यामुळे घरासाठी दिव्यांचं तोरण लावताना आपल्या दरवाजाचा आकार लक्षात घेऊन निवड करा. घराचा दरवाजा, खिडक्या, गॅलरी, कठडे अशा अनेक ठिकाणी तुम्ही ही तोरणं लावू शकता.
घरात काही शोभेची झाडं असतील तर त्यावरही लाईटची माळ अलगद सोडू शकतात. मात्र थोडय़ा वेळाने ती बंद करावीत, नाही तर झाडांना त्रास होईल. अगदी माळ लावली नाही तरीही लाईट सोडा. तोदेखील पुरेसा होतो. झाडांच्या कुंडय़ा सजवा. गेरूने किंवा अन्य कोणत्याही ऑईलपेंटने त्या रंगवा. हवी तशी कलाकुसर करू शकता.
बाजारात पणत्यांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. रांगोळी पुढे ठेवायला, कठडय़ावर, खिडकीवर, ठेवायला अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. वर्क केलेल्या पणत्या तर मिळतीलच मात्र त्याचबरोबर साध्या पणत्याही मिळतील. त्या घरी आणून आपल्या आवडीप्रमाणे रंगवू शकतात.
काही पणत्या तर इलेक्ट्रिकवरही असतात. त्या दिसायलाही छान दिसतात आणि शिवाय वा-याबरोबर त्या हलणार किंवा विझणारदेखील नाहीत. त्यामुळे धोकाही उद्भवणार नाही.
दारापुढे आकाशकंदील तर तुम्ही लावालच. मात्र घराबाहेर लावायला जागा नसेल तर खिडकीवरही तो लावता येईल. घरातल्या खिडकीवरही आकाशकंदील लावू शकतात. मोठा कंदील नको असेल तर शोभेचे लहान लहान कंदीलही लावू शकतात. यात लाईट लावायची गरज नाही. त्यांचे नानाविध रंग आणि त्यांचा आकार यामुळे ते छान दिसतात. बाजारात हे डझनवारी मिळतील.
नेहमीच्या रांगोळीच्या स्टीकरचा विचार करायला हरकत नाही. मात्र त्याहीपेक्षा हल्ली मण्यांची कलाकुसर असलेल्या रेडिमेड रांगोळ्या बाजारात आहेत. त्यापासून आपण कलश, स्वस्तिक असे बरच काही करू शकतात. मुख्य म्हणजे या रांगोळ्या पुसल्या जाण्याचीही भीती नाही. काम झाल्यानंतर आपण त्या पुन्हा उचलूनही ठेवू शकतो.
एखादी सोफ्याजवळची किंवा बेडच्या मागच्या भिंतीला फुलांच्या माळा लावा. एकमेकांना खेटून किंवा काहीशा अंतरावर दोन रंगांची संगती केल्यास त्या खूप छान दिसतील. घरात जिना असल्यास त्यावरही या फुलांच्या आणि पानांच्या माळा टांगू शकतात.
हल्ली पाण्यातल्या रांगोळ्या किंवा मेणबत्त्या ठेवण्याचे फॅड आहे. घरात मध्यभागी असलेल्या टीपॉयवर हे मेणबत्ती असलेले पॉट छान दिसतात. जाळीजाळीचे दिवे तर खूप छान दिसतात. रात्रीच्या अंधारातही त्या जाळ्यांमधून पडणारा प्रकाश घराला उजळून टाकतो. घराच्या कोप-यात अशी सजावट छान दिसते.
घरातल्या बेडवरची बेडशीट सॅटिन किंवा वर्कवाली घेतली तर छान दिसेल आणि त्याला पारंपरिक जरी बॉर्डर असलेली आणि काहीसे गडद रंगांची कुशन कव्हर्स घालावीत, त्याने शोभा अधिकच वाढते. आपण सोफ्याच्या कुशनची कव्हरंदेखील बदलू शकतात. सोफ्यावर गडद रंग वापरला तर सोफ्याची शोभा वाढलीच म्हणून समजा.