आहारात फलाहार तंतुमय पदार्थांचे (फायबर) फायदे ?
आहार हा सकस असावा असे आपण अनेकदा ऐकतो! आहाराचे प्रकार आणि त्यात असणारे अन्नघटक यात आपल्या शरीरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे एकदा कळालं कि नक्कीच आपल्याला आपले आरोग्य राखण्यास मदत होईल. आहारात फलाहार घेणे अत्यंत उपयुक्त असे सुचवले जाते त्याचे कारण असे कि फळांमध्ये तंतुमय गुण असतात. तंतू म्हणजे फायबर!
तंतुमय पदार्थांचे फायदे कोणते?
तंतुमय पदार्थाचे शरीराला अनेक फायदे होतात. रोजची मलप्रवृत्ती म्हणजेच पोट साफ राहण्यास तंतुमय पदार्थाची मदत होते. शरीराची पचनक्रिया सुधारल्याने वजन नियंत्रणात राहण्यासाठी तंतुमय पदार्थ उपयोगी पडतात. फळे, पालेभाज्या, तृणधान्ये (पॉलिश न केलेले) यांमुळे कोलेस्टरॉल कमी होते.
तंतुमय पदार्थ आहारात घेतल्याने शरीरातील साखरेचे प्रमाणही आटोक्यात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आहारामध्ये आवर्जून तंतुमय पदार्थ खावेत. हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन वाढवणारे अतिरिक्त अन्नपदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात.
तंतुमय पदार्थ नेमके कोणते?
- कच्चे चिरलेले सॅलड, कोशिंबीर, कच्चे मोड आलेली कडधान्य किंवा त्यांमध्ये भाज्या घालून केलेले सॅलड हा दैनंदिन आहाराचा भाग असणे आवश्यक आहे. गहू, तांदूळ, ज्वारी यांचा पोळी किंवा भाकरीसाठी वापर करताना त्यातील कोंडा चाळून टाकू नये. कोंड्यामधून देखील शरीराला आवश्यक तंतुमय पदार्थाचा पुरवठा होतो.
- भाज्या अतिरिक्त प्रमाणात शिजवल्यानेसुद्धा त्यातील तंतुमय पदार्थ नष्ट होतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा सॅलड आणि भाज्या कापून जास्त वेळ न ठेवता लगेच खावाव्यात. फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा सालीसह संपूर्ण फळ खाल्ल्याने ही शरीराला अधिक प्रमाणात फायबर मिळतात.