सत्यभामा महापात्रा कोण होती?

सरळ आणि थोडक्यात सांगायचं तर, सत्यभामा महापात्रा ही ओरिसातील नयागढ इथं राहणारी एक ६५ वर्ष वयाची निवृत्त शिक्षिका होती. अशा कितीतरी स्त्रिया ओरिसातच काय, पण संपूर्ण भारतात, किंबहुना जगातही असतील. मग सत्यभामा महापात्राचं नाव आज गिनेस बुकात नोंदलं जाण्याचे कारण काय? असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडेल. त्याचंही सरळ उत्तर आहे. मुलाला जन्म देणारी ती जगातली त्या वेळची सर्वात वयस्कर स्त्री होती.

त्याचं असं झालं, की लग्नाला पन्नास वर्ष होऊनही सत्यभामाची कूस काही उजवली नव्हती. आपल्याला मूल नाही याचं दुःख उराशी बाळगतच तिनं आणि तिच्या पतीनं, कृष्णम्माचारीनं, तोवरचं आयुष्य कंठलं होतं. पण एवढं वय होऊनही माता होण्याची तिची आस बुजली नव्हती. आता आपली इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, अशीच तिनं आपली समजूत करून घेतली होती. कारण तिची ऋतुसमाप्ती कधीच झाली होती. म्हणजेचं तिचं प्रजननाचं वय केव्हाच उलटून गेलं होतं. अशा वेळी तिच्या पुतणीनं तिला मदत करायचं ठरवलं. त्या पुतणीनं आपलं बीज दान करण्याचे आश्वासन दिलं. त्याबरोबर सत्यभामा उत्साहित झाली. तिनं डॉक्टरांकडे धाव घेतली. शरीरबाह्य फलनाच्या तंत्रानं म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान वापरून आपल्या पोटी गर्भस्थापना करावी, असा आग्रह तिनं घरला. तिचं वय पाहून डॉक्टरांनी नकार दिला आणि तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला; पण तिची जिद्द पाहून त्यांचंच मतपरिवर्तन झालं. तिच्या पुतणीच्या नवऱ्याचंच वीर्य वापरून त्या बीजाचं फलन करण्यात आलं आणि त्यातून तयार झालेला गर्भ मग सत्यभामाच्या गर्भाशयात रुजवण्यात आला.

ही पहिली कसोटी तर पार पडली. पण पुढची नऊ महिन्यांची गर्भावस्थाही सत्यभामाला पेलवेल की नाही, याची डॉक्टरांना शंका होती. पहिले सहा महिने उलटले; पण त्यानंतर सत्यभामाची स्थिती नाजूक बनली. तेव्हा डॉक्टरांनी तिला सरळ इस्पितळातच दाखल करून घेतलं. गर्भधारणेचे शेवटचे तीन महिने मग तिनं तिथंच काढले. प्रसूतीही नैसर्गिकरित्या सुरळित होईल याची खात्री डॉक्टरांना वाटेना. तेव्हा त्यांनी सीझेरियन शस्त्रक्रियेच्या मदतीनं तीन किलो वजनाच्या सुदृढ मुलाला जन्माला घातलं.

त्या क्षणी सत्यभामाचं नाव रेकॉर्ड पुस्तकांमध्ये जाऊन बसलं. कारण त्यापूर्वीचा उच्चांक होता ६३ वर्षांचा. त्या वयाच्या एका इटालियन स्त्रीनं मुलीला जन्म दिला होता. त्यापूर्वी मुंबईची एक ५८ वर्षांची स्त्री माता बनली होती. सत्यभामाचा उच्चांक अधिकच विलक्षण आहे, कारण भारतीय स्त्रियांचे सरासरी आयु्मानच मुळी ६३ वर्षांचं आहे. साहजिकच ऋतुसमाप्तीचं वयही कमी असतं. या दोन्ही अडचणींवर मात करत सत्यभामा महापात्रा ही जगातली माता होणारी सर्वात वयस्कर स्त्री बनली आहे.

डॉ. बाळ फोंडके

Leave a comment