तुम्ही रात्री झोपेत घोरता ? मग तुम्हाला हे माहीत असायलाच हवं
घोरणे हे स्लीप अॅप्निया नामक व्याधीचे लक्षण असू शकते, याची कल्पना आपल्यापैकी अनेकांना नसेल. अनेक जण झोपेत मोठ्याने घोरत असतात. यापैकी अनेकांना आपण झोपेत घोरतो हेच मुळी माहीत नसते, हे अनेकांना ठाऊक नसते.
या व्याधीमुळे रक्तामधील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच घोरणे सुरू होते. 45 टक्के लोक अधूनमधून घोरत असतात; तर 25 टक्के लोक नेहमीच घोरत असतात.
घोरणे म्हणजे नेमकं काय?
आपल्या श्वासनलिकेच्या जवळपास अतिरिक्त मेदयुक्त घटक जमा झाल्यामुळे श्वासनलिकेला जोडणार्या अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. श्वासाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. याचा परिणाम म्हणजे आपण घोरायला लागतो.
घोरण्याची कारणे
- जाडीमुळे श्वासनलिका आणि मुखनलिका यांच्यामध्ये चरबी जमा होणे.
- वयोमानानुसार गळ्यातील नलिका आकुंचन पावणे. या कारणामुळे पुरुषांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
- मद्यपान, धूम्रपान आणि नैराश्य यांवर घेतल्या जाणार्या औषधांचा परिणाम म्हणून अनेक जण घोरतात.
- अस्थमामुळेही अनेक जण घोरतात.
- ज्यांची टाळू व्यवस्थित भरली गेलेली नाही, तसेच ज्यांचा जिभेचा आकार प्रमाणापेक्षा मोठा आहे आणि टॉन्सिल्समुळे घोरण्याची समस्या उदभवते.
घोरण्याच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर घोरत असाल तर आपली वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याचे कारण जे लोक अनेक दिवसांपासून घोरतात त्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारख्या गंभीर व्याधी होतात, असे दिसून आले आहे.