महाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती | Maharashtra name Meaning and it’s Origin
महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते.
Maharashtra name meaning and it’s origin.
देश, राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात. परंतु पूर्वीच्या काळी गणराज्ये होती. प्राचीन काळी ‘आर्यावर्त’ आणि ‘दक्षिणपथ’ असे भारताचे दोन विभाग होते. उत्तरेत ‘आर्य’ व दक्षिणेत ‘द्रविड’ लोक राहत असत. विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला ‘दक्षिणपथ’ म्हटले जाई. यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरांत, कुंतल व देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो.
सर्वप्रथम कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आहे.
इ. स. पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात ‘महारठ्ठ’ प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातून प्राप्त होतो.
इ.स.पू. दुसऱ्या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात महारठ्ठ असा उल्लेख आढळतो.
इ. स. ३६५ च्या मध्य प्रदेशातील ‘एरण’ स्तंभालेखात राजा श्रीधर वर्माचा सेनापती ‘सत्यनागा’ हा स्वतःला महाराष्ट्री म्हणवतो.
चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचे आढळते.
डॉ. भांडारकरांनी असे मत मांडले आहे की, ‘रठ्ठ’ या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रीक असून ‘भोज’ स्वतःला महाभोज म्हणत असत. तसेच’ राष्ट्रीक’ आपणास महाराष्ट्रीक म्हणत असत.
महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून वा वंशावरून पडले नसून ते प्रदेशाच्या विस्तारावरून पडले, असे मत पा. वा. काणे यांनी मांडले आहे.