आदिवासी समाजक्रांतीचे जनक बिरसा मुंडा
आदिवासी समाजक्रांतीचे जनक वीर बिरसा मुंडा यांची आज जयंती. आपल्याला भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांचा इतिहास माहित आहे, पण आपल्यापैकी किती जण बिरसा मुंडा यांचा इतिहास जाणतात…? चला आज क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा साहसी इतिहास थोडक्यात जाणून घेवूयात !
झारखंडमधील उलिहातु या खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी बिरसा मुंडा यांचा (15 नोव्हेंबर 1875) जन्म झाला. जन्म गुरुवारी म्हणजे बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव ‘बिरसाʼ ठेवण्यात आले.
बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गावी गेले. बासरी वाजविणे, नृत्य, चित्र रेखाटणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते.
बिरसांना शिक्षणाची आवड होती. सुरुवातीला ते आयुभातुजवळ सलगा गावी जयपाल नाग या वनवासी व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात जात. तत्पूर्वी शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला.
बिरसा यांनी आनंद पांडे या वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये, धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले. तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली. म्हणून ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले.
इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला.
कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. त्यामध्ये सुमारे 5 हजार आदिवासी सामील झाले. यानंतर रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे निधन (9 जून 1900) झाले.