रासबिहारी बोस : आझाद हिंद सेना, हार्डिंग्जवर बाँबस्फोट
‘गदर’ या क्रांतिकारी संघटनेचे नेते. यांनीच पुढे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली
भारतीय जनतेवर अत्याचार करून दडपशाहीच्या वरवंट्याखाली जनतेला भरडणार्या गव्हर्नर हार्डिंग्जने जेव्हा कलकत्त्याहून दिल्लीला इंग्रजांची राजधानी हलवली,तेव्हाच दिल्लीतल्या त्याच्या स्वागताच्या मिरवणुकीतच बाँबस्फोट घडवून आणून दिल्लीतल्या चांदणीचौकातून थेट स्वर्गातच हार्डिंग्जची रवानगी करण्याचा धाडसी बेत रासबिहारी बोस यांनी आखला होता. तो दिवस होता 22 डिसेंबर 1912.
शृंगारलेल्या हत्तीवर स्वार झालेल्या गव्हर्नर हार्डिंग्जची मिरवणूक मोठ्या दिमाखात चांदणी चौकातून हळूहळू पुढे सरकत होती.
तेवढ्यात कानठळ्या बसवणारा जोरदार धमाका झाला.जो तो सैरावैरा धावत सुटला.खरंतर हार्डिंग्जच्या चिंधड्या चिंधड्याच व्हायच्या होत्या;पण तो थोडक्यात वाचला;जबर जखमी मात्र झाला.त्याचा अंगरक्षक मात्र जागीच ठार झाला.
या प्रकरणी रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरवण्यात आला.हा खटला ‘दिल्ली खटला’ म्हणून ओळखला जातो.
या कटात अवधबिहारी,मास्टर अमिरचंद व भाई बालमुकुंद यांचाही सहभाग होता.या सर्वांना दिल्ली कटात फाशी देण्यात आली. मात्र रासबिहारी बोस शेवटपर्यंत इंग्रजांच्या हाती लागले नाहीत.
हार्डिंग्जवर बॉम्ब फेकणारे रासबिहारी पुढे टोकियोला गेले.
संपूर्ण स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते असणा-या रासबिहारींनी आपल्या विचारांच्या प्रसारार्थ ‘द व्हॉईस ऑफ एशिया’ हे नियतकालिक काढले.
राजा महेंद्र प्रतापसिंग यांच्यासह ‘इंडिपेंडन्स लीग ऑफ इंडिया’ची स्थापना केली.
15 जून 1942 या दिवशी बँकाँक येथे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग ऑफ ईस्ट एशिया’चे अधिवेशन भरविले.यातूनच आझाद हिंद फौजेची उभारणी झाली, जिचे नेतृत्व पुढे नेताजी सुभाषचंद्रांनी केले.
अनेक भाषांवर प्रभुत्व,गुप्ततेच्या नियमांचे जाणकार,चाणाक्षपणा आणि हजरजबाबीपणा,बेमालूम वेषांतर करण्याची हातोटी या सा-यांमुळे क्रांतिकारकांचे मुकुटमणी ठरलेल्या रासबिहारी बोस यांच्यामुळेच सुभाषचंद्रांच्या कर्तृत्वाला विस्तारित क्षेत्र लाभले होते.
रासबिहारी बोस,बंगालचे सुपुत्र.
आपलं निम्म्यापेक्षाही जास्त आयुष्य भारताबाहेर जपानमध्ये व्यतीत करून तिथूनच भारताच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा क्षण न् क्षण वेचणा-या एका महान क्रांतिकारकाचा आज स्मृतिदिन.
आझाद हिंद सेना
मार्च 1942 रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे पूर्वेकडील देशातील 40000 हिंदी युद्धकैद्याची आझाद हिंद सेना (INA) उभारली.
ब्रिटिश सरकार दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले असल्यामुळे आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ झाली.
- निशान : तिरंगा ध्वज (झेपावणार्या वाघाचे चित्र)
- घोषवाक्य : “चलो दिल्ली”
- बोधवाक्य : एकता-विश्वास-बलिदान
- समर गीत : कदम कदम बढाये जा
- अभिवादनाचे शब्द : जय हिंद