लातूर जिल्हा माहिती
महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील एक जिल्हा. लातूर जिल्ह्याचा विस्तार १८° ०५’ उत्तर ते १९° १५’ उत्तर अक्षांश आणि ७६° २५’ पूर्व ते ७७° ३५’ पूर्व रेखांशां दरम्यान आहे. लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७,३७२ चौ. किमी. असून त्याची पूर्व – पश्चिम लांबी सु. ११२ किमी. व उत्तर दक्षिण रूंदी ११३ किमी. आहे. लोकसंख्या १२,९३,३५४ (१९८१).
उस्मा नाबाद जिल्ह्यातील पूर्वेकडील लातूर, अहमदपूर, उदगीर निलंगा व औसा या पाच तालुक्यांचा एक समूह १६ ऑगस्ट १९८२ रोजी वेगळा करण्यात येऊन लातूर जिल्हा निर्माण करण्यात आला. त्याचा पश्चिमेस उस्मनाबाद, वायव्येस बीड, उत्तरेस परभणी, ईशान्येस नांदेड हे जिल्हे आणि आग्नेयीस कर्नाटक राज्य आहे.
हा प्रदेश पूर्वीचा हैदराबाद संस्थानचा भाग असून स्वां तंत्र्योत्तर काळात तालुक्यांची पुर्नरचना करण्यात आली. १९५६ च्या राज्यपुनर्रचनेनुसार बीदर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा व उदगीर हे तालुके त्या वेळच्या उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. लातूर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाई तालुक्यातील रेणापूर महसूल मंडळातील ५४ गावे आणि वाड्या लातूर तालुक्यात समाविष्ट करण्यात आल्या.
लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या २.४०% आणि लोकसंख्या राज्याच्या जवळजवळ २.०६% आहे. जिल्ह्यात पाच तालुके आणि ९०४ गावे आहेत. त्यांपैकी ८८५ गावांत वस्ती असून १९ गावे निर्जन आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय लातूर (लोकसंख्या १,१२,०००-१९८१) येथे आहे.
लातूर जिल्ह्याचे भूवर्णन
या जिल्ह्याचे सर्वसाधारण दोन नैसर्गिक भाग पडतात. तेरणा नदीच्या उत्तरेकडील बालाघाट पर्वतश्रेणीने व्यापलेला पठरी प्रदेश आणि नदीच्या दक्षिणेकडील सखल मैदानी प्रदेश. यांत अहमदपूर – उदगीर भागातील मन्याड – लेंडी नद्यांचा मैदानी प्रदेश, मांजरा व तावरजा नद्यांच्या खोऱ्यां चा प्रदेश आणि तेरणा व तिच्या उपनद्यांचा प्रदेश अंतर्भूत होतो. बालघाटची एक शाखा अहमदनगर जिल्ह्यातून येथे येते. तिने लातूर, निलंगा व औसा तालुक्यांचा उत्तरेकडील काही भाग व्यापला असून बाला घाटची दुसरी शाखा अहमदपूर व उदगीर तालुक्यातील दक्षिण भागात वायव्येकडून आग्नेयीकडे जाते. उदगीर तालुक्यात पर्वतरांगांना विभागणारी खोरी असून पठारी प्रदेश सस. पासून सरासरी ६०९ मी. उंच आहे. जिल्ह्यातील जमिनीचे मुख्यतः दोन भाग पडतात. एका भागात सर्वसाधारण हलकी व मध्यम हलकी जमीन असून ती कमी आर्दता शोषणारी आहे. याच भागात काही ठिकाणी तांबड्या रंगाची जांभा मृदा आढळते. दुसऱ्या भागातील जमीन काळी व कसदार असून काही ठिकाणी हलक्या प्रतीची आहे. तीत काळी कन्हार व थोडे क्षारयुक्त पातळ थर असलेले मृदा प्रकार आढळतात. कन्हार जमिनीचे, (गाळाची सुपीक जमिन) प्रमाण नदीखोऱ्यात आढळते. मृदा चिकट, चांगल्या पोताची व आर्द्रता टिकवून धरणारी असल्याने तीत वर्षातून दोन पिके घेतली जातात. नद्यांपासून थोड्या उंचवट्याच्या भागात भरड पोताची जमीन आहे. यमृदेत वाळू, चुना किंवा दोन्हीं चे मिश्रण आढळते. कन्हार व भरड पोताची जमीन मुख्यतः तेरणा, मांजरा व तावरजा नद्यांच्या परिसरात आढळते. डोंगर पायथ्याच्या व डोंगर – उताराच्या भागांत कमी प्रतीची वाळू मिश्रित रेताड जमीन आहे. मांजरा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असून तेरणा, तावरजा व धरणी या उपनद्यांसह ती बाला घाट पठारावरून जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. तेरणा ही उपनदी औसा तालुक्यातून जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सरहद्दी वरून वाहत जाते आणि पुढे निलंगा तालुक्यात पूर्व सरहद्दीवर मांजरा नदीस मिळते. मन्याड व लेंडी या लहान उपनद्या असून मन्याड अहमदपूर तालुक्यात उगम पावते व उत्तरेकडे नांदेड जिल्ह्यात जाते, तर लेंडी अहमदपूर व उदगीर तालुक्यां तून वाहते. धरणी नदी वडवळ – राजूरच्या उत्तरेकडे तीन किमी. वर उगम पावून दक्षिणेकडे राजूरा, धरणी, नळेगाव या गावावरून वाहत जाऊन पुढे जळगावजवळ मांजरा नदीस मिळते.
लातूर जिल्ह्याचे हवामान
जिल्ह्याचे हवामान सौम्य व कोरडे आहे. साधारणतः डिसेंबर – जानेवारी हे थंड महिने तर मे व जून हे सर्वात उष्ण महिने असतात. मात्र विदर्भातील अति – उष्ण हवमान येथे आढळत नाही. उन्हाळ्यात दैनिक सरासरी कमाल तापमान ४०° से. व किमान २५° से. एवढे असते. काही वेळा उन्हाळ्यातील तापमान ४५° से. पर्यंत जाते. तर हिवाळ्यात ते १३° से. पर्यंत उतरते. या जिल्ह्यात ९०° टक्के पाऊस नैॠत्य मॉन्सूनचा पडतो. जूनच्या मध्यास पर्जन्यवृष्टीस प्रारंभ होऊन पावसाळा ऑक्टोबरअखेर संपतो. औसा व निलंगा तालुक्यां त सरासरी पर्जन्यमान ८० सें मी. असून लातूर, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यां त ते सरासरी ९० सें मी. आहे. एकूण जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ७४ सें मी. आढळते. उन्हाळ्यात चक्रवात आणि नैॠत्य मोसमी वाऱ्यांच्या सुरूवातीच्या काळात झंझावत येतात. निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे जिल्ह्यात जंगलाखालील क्षेत्र अगदीच नगण्य म्हणजे ०.१६% अवर्गीकृत जंगलक्षेत्र (१ ,१४० हेक्टर) असून जो काही जंगलाचा प्रदेश आहे तो प्रामुख्याने वनाच्छिदित डोंगररांगां वर आढळतो. त्यात बाभूळ, पळस, कडुनिंब, जांभूळ, डिकेमाली इ. वनस्पती प्रकार आढळतात मात्र झाडे विखुरलेली आहेत आणि पठारी भागात डोंगर – उतारावर गवत उगवते. अहमदपुर तालुक्यात वडवळ गावाजवळ बेट नावाच्या डों गरावर अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. जंगलात हरीण, मुंगूस, तरस, कोल्हा, वानर, माकड इ. प्राणी व विविध पक्षी आहेत. एकू ण वन्य प्राणी कमी आहेत. वनक्षेत्र नसल्यामुळे वनउत्पादनसुध्दा अगदी अल्पच आहे तथापि तेंदूच्या पानांपासून १९८८ -८९ या आर्थिक वर्षात २२० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले.
लातूर जिल्ह्याचा इतिहास
लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक परंपरा आहे तथापि येथील प्रागितिहासाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. मौर्य वंशाचा महाराष्ट्राशी संपर्क आला, पण मौर्यसत्तेच्या अधिपत्याखाली लातूर जिल्हा होता किंवा काय, याविषयी माहिती उपलब्ध नाही. अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा लक्षात घेता सध्याच्या महाराष्ट्राचा बराचसा भूभाग त्याच्या अंमलाखाली होता. त्यानंतर त्या भागावर सातवाहन वंशाची अधिसत्ता (इ. स. पू. १४३- इ. स. २०३) होती. त्या वंशातील राजा दुसरा सातकर्णी (कार. इ. स. पू. १४३-८६) याचे अधिपत्य होते. पुराणानुसार त्याने जवळजवळ ५६ वर्षे राज्य करून राज्यविस्तार केला. सातवाहन घराण्यातील सुविख्यात राजा गौतमीपुत्र सातकर्णी (इ. स. ८०-८६) हा होय. याने महाराष्ट्र, वऱ्हाड आणि मराठवाडा हे भाग पादाक्रांत करून त्यावर आपला अंमल बसविला. यानंतरचा लातूर जिल्ह्याचा चालुक्य काळापर्यंतचया इतिहास सुस्पष्ट नाही. बा दामीच्या, चालुक्यांच्या वेळी (इ. स. ५३५ – इ. स. ७५७) हा प्रदेश त्यांच्या अधिपत्याखाली असावा कारण चालुक्यांचा एक सामंत आणि राष्ट्रकुट घराण्याचा मुळ पुरूष दंतिदुर्ग याचा उल्लेख ताम्रपटांत महासामंताधिपती व समधी गत पंचमहाशब्द या बिरूदांनी केला आहे आणि काही ताम्रपटांत ‘लट्टलूर’ असा लातूरचा उल्लेख आढळतो. त्यावरून चालक्यांनतर राष्ट्रकुटांनी येथे साम्राज्य स्थापिले. दंतिदुर्ग (कार. ७१३ – ७५८) याने दीर्घकाळ राज्य केले. दंतिदुर्ग याची माहिती तेरखेडा आणि मुलताई येथील ताम्रपटां वरून ज्ञात झाली असून लट्टलूर म्हणजेच लातूर हे राष्ट्रकुट घराण्याचे मुलस्थान असल्याचा उल्लेख मिळतो. पुढे हे घराणे उत्तर महाराष्ट्रात विदर्भात गेले असावेत. राष्ट्रकूट राजे स्वतःला लट्टलूरपुरव रा धीश हे बिरूद लावीत. पहिल्या अमोघवर्षाच्या सिरूर आणि निलगुंड ताम्रपटां तून लट्टलूर हे एक उत्तम नगर असल्याचा उल्लेख मिळतो. राष्ट्रकूटांच्या पाडावानंतर उत्तर कालीन चालुक्यानी दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागां वर प्रभुत्व प्रस्थापिले. पहिला आणि दुसरा सोमेश्वर आणि सहावा विक्रमादित्य (कार. इ. स. १०७६-११२६) या राजांनी लातूर जिल्ह्यावर अनेक वर्ष वर्च स्व गाजविले. विक्रमादित्याचा मुलगा तिसरा सोमेश्वर याला सर्वज्ञचक्रवर्ती म्हणत. त्याचा इ. स. ११२८ चा एक कोरीव लेख लातूर येथे सापडला असून त्यामध्ये लातूरचा लट्टालूर असा नामनिर्देश आणि पापविनाश मंदिर बांधल्याचा उल्लेख सापडतो. पुढे राष्ट्रकू टांचे आणि नंतर चालुक्यांचे मांडलिक असलेल्या यादव घराण्याने (कार. ११८५-१३१८) या प्रदेशावर दीर्घकाल वर्चस्व गाजविले. यादवांच्या शीलालेखांतून जिल्ह्यातील मंदिराविषयी तसेच दानपत्राविषयी माहिती मिळते. अलाउद्दीनच्या मुलगा मुबारक याने १३१८ मध्ये यादवांचे राज्य नष्ट केले. अशाप्रकारे दिल्लीच्या सुलतानशाहीने हा प्रदेश पादाक्रांत केला. पुढे हा प्रदेश बहमनी सत्ता (१३४७ -१५३८), आदिलशाही (१५३८-१६८६) आणि निजामशाही यांच्या अधिपत्याखाली होता. आदिलशाहीत शा हज हा नने उदगीरचा किल्ला घेऊन (१६३६) सभोवतालचा प्रदेश पादाक्रांत केला तथापि शाहज हा न व अहमदशाह आदिलशाह यांत तह होऊन (२८ सप्टेंबर १६३६) कृष्णा नदीच्या पलीकडील प्रदेश मोगलांकडे व अलीकडील प्रदेश आदिलशाहकडे राहिला. यासाठी आदिलशहाने वीस लाख होन खंडणी देण्याचे कबूल केले. यानंतर १६८१ मध्ये औरंगजेब दक्षिणेच्या स्वारीवर आला असता त्याने दक्षिणेतील आदिलशाही नष्ट केली आणि या जिल्ह्यावर मोगलांचा अंमल प्रस्थापित झाला. १७२४ च्या लढाईत निजाम – उल् – मुल्क याने मुबारीझ खान या मोगल सरदार – सेनापतीचा पराभव करून दक्षिणेत भागानगर (हैदराबाद) येथे स्वतंत्र संस्थान स्थापन केले. तथापि मराठे व निजाम यांत वारंवार संघर्ष होत. मराठ्यांनी निजामाचा पालखेड (१७२८), भोपाळ (१७३७) व उदगीर (१७५९) या लढायांत पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश भारत स्वतंत्र होईपर्यंत निजामाच्या अखत्यारीत होता. निजामाने १८५३ मध्ये हा प्रदेश ब्रिटिशांना दिला, परंतु पुन्हा तो १८६० मध्ये परत घेतला. इ. स. १९०४ पर्यंत नळदुर्ग जिल्हा व त्यानंतर उस्मा नाबाद हा नवीन जिल्हा स्थापण्यात आला आणि १९०५ मध्ये औसा हे तालुक्याचे मुख्यालय लातूर येथे हलविण्यात आले. या तालुक्याचा समावेश हैदराबाद संस्थानाच्या सर्फ-इ-खास या प्रदेशात करण्यात आला. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर (१९४८) त्याचा अंतर्भाव तत्कालीन मुंबई इलाख्यात आणि १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई व्दैभाषिक राज्यात व १९६० नंतर महाराष्ट्र राज्यात करण्यात आला.
लातूर जिल्ह्याची आर्थिक स्थिती
लातूर जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून सु. ८० % टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ते घेतले जाते. दुसोट्याचे क्षेत्र सु. ८ ,८९९ हेक्टर असून त्याची सर्वसाधारण टक्केवारी ३०.४१ आहे. खरीप हंगामात ज्वारी, कापूस, मूग, तूर, भात, भुईमूग इ. पिके घेतली जातात. रब्बी हंगामात प्रामुख्याने रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, यांची पिके घेतात. जिल्ह्यात एकूण ६ ·६७ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली असून त्यापैकी ९४ टक्के क्षेत्रात १९८८मध्ये पीक लागवड झाली होती. त्यांपैकी ८०% जमीन कोरडवाहू आहे. १९८८-८९ या संदर्भवर्षात जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पिकांचे उत्पन्न (मे. टन) पुढीलप्रमाणे झाले – ज्वारी ९५,०००, गहू २७,२००, तांदूळ ११,४००, तूर २०,६००, उडीद ११,५००, तेलबिया १९,७००, हरभरा १३,७००, मूग ६,८००, भुईमूग १५,८००. ज्वारीचे उत्पनन प्रतिहेक्टरी सरासरी ४६१ किलो तर तूर ३२४ किलो आणि हरभरा ४९३ किलो होते. याशिवाय जिल्ह्यात त्यावर्षी कापसाचे उत्पादन २,३०० मेट्रिक टन झाले. लातूर – निलंगा तालुक्यांत जिल्ह्यातील सर्वात जास्त कापूस, तूर व उडीद ही पिके घेतात. १९८३ या संदर्भवर्षात ३८,१६४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते. यांपैकी ८४ % टक्के विहिरीच्या पाण्यावर आणि उर्वरित १६ टक्के क्षेत्र जलसिंचन प्रकल्पांच्या कालव्यांद्वारे भिजविण्यात आले होते. जलसिंचनाचा सर्वाधिक निलंगा तालुक्यात (३२ टक्के) व त्या खालोखाल अनुक्रमे लातूर (२८ टक्के), औसा (२३ टक्के) उदगीर (९ टक्के) आणि अहमदपूर (८ टक्के) यांना मिहाला. जिल्ह्यात अहमदपूर तालुका वगळता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. अहमदपूर तालुक्यात मात्र दोन समित्या आहेत. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्री करण्यात येते. १९८८ -८९ सालात या नियंत्रित बाजारपेठां त एकूण १ ,५१,८५८ मेट्रिक टन मालाची आवक झाली. त्यात कडधान्यां ची आवक सर्वात मोठी म्हणजे ६७ ,६८९ मेट्रिक टन होती. लातूर व औसा येथील बाजारपेठा मोठ्या असून धान्याची फार मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. याच वर्षात मृदा संधारण योजनेखाली ३ ,९२६ हेक्टर क्षेत्रात बांधबंदिस्ती करण्यात आली.
जिल्ह्यात मांजरा व निम्न तेरणा असे दोन मोठे जलसिंचन प्रकल्प असून त्यापैकी मांजरा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे व तेरणाचे अद्यापि चालू आहे. मांजरा प्रकल्पाच्या कालव्याची एकूण लांबी १६८ किमी. असून जलाशयाची कमाल क्षमता २५१ ·९२ द. ल. ध. मी टर. आहे. या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लागवडलायक क्षेत्र १८ ,२२३ हेक्टर असून १४ ,४१० हेक्टर क्षेत्र लातूर जिल्ह्यात येते व उर्वरित क्षेत्र बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात अंतर्भूत होते. उमरगा येथील माकणी येथे निम्न तेरणा प्रकल्पाचे काम चालू आहे. त्याच्या कालव्याची लांबी १८९ .५ किमी. असून जलाशयाची कमाल क्षमता १२३·९७ द. ल. घ. मीटर. आहे. या धरणामुळे लातूर जिल्ह्यातील सुमारे १५ ,२१४ हेक्टर क्षेत्र व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३,१४२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल. याशिवाय जिल्ह्यात तिरू, घरणी, व्हटी, गिरकचाळ, औराद (शहाजनी), तावरजा हे काही छोटे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आणि साकोळ, मसलगा, रायगव्हाण, नागठाणा या प्रकल्पांचे काम चालू आहे. मात्र रेणापूर या संकल्पित प्रकल्पाचे काम अद्याचि सुरू व्हावयाचे आहे. बांधकाम चालू असले ल्या प्रकल्पांची एकूण लांबी १८५ ·८६ किमी. असून त्यां तील जलाशयांची कमाल क्षमता ८० ·३१ द. ल. घ. मीटर आहे. हे छोटे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे १३,७७२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल, याव्यतिरीक्त १९८८ -८९ सालात लहान पाटबंधारे, उपसासिंचन योजना, बंधारे इ. १०७ लघुसिंचनाची कामे पूर्ण झाली होती. यापैकी पंचवीस लातूर, चोवीस निलंगा, तेवीस अहमदपूर, अठरा औसा, पंधरा उदगीर येथे आहे.
जिल्ह्यात पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा आणि दुग्धव्यवसाय यांबाबतीत बरीच प्रगती झाली आहे. जिल्ह्यात १९८७ साली एकूण पशुधन ७,०८,००० होते. त्यांपैकी ३,७५,००० गायी व बैल, १,१७,००० म्हशी व रेडे, ३९,००० मेंढ्या, १,४२,००० शेळ्या व १,५०,००० कों बड्या व बदके होती. १९८८-८९ या वर्षात ६७·४ लाख लिटर दुध संकलन करण्यात आले. जिल्ह्यात जनावरांसाठी १११ उपचार केंद्रे फिरती वैद्यकीय पथके मदत केंद्रे व दवाखाने होते .
याशिवाय कृत्रिम गर्भधारणेची १०९ केंद्रे होती. उदगीर येथे दूधभुकटीचा मोठा प्रकल्प असून त्याची सरासरी क्षमता दर दिवशी ११·७ टन आहे. शिवाय अह मदपूर, औसा, निलंगा, मुरूड या गावांतून दूध शीतकरण केंद्रे आहेत. जिल्ह्यात प्रतिदिनी १,४४,००० लिटर दूधसंकलन होते (१९८९).
जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विकास कार्यक्रमांना चालना मिळाली असून विविध जलाशयांतून एकूण ४४.९९ लाख मत्स्यबीजव्यवसाय खात्यामार्फत मासे सोडण्यात आले आहेत. त्यांतून ३४५ मेट्रिक टन मासळीचे उत्पादन मिळाले आणि ३३·५० लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले (१९८९). विद्युतीकरणाच्या बाबतीत लातूर जिल्हा आघाडीवर असून मार्च १९८९ अखेर जिल्ह्यातील पाच शहरे धरून ९०४ गावांपैकी बहुतेक सर्व गावांना वीजपुरवठा करण्यात आलेला होता. हा मुख्यत्वे जल व औष्णिक विद्युत् केंद्राद्वारे होतो. खनिज उत्पन्न जिल्ह्यात नगण्य आहे. १९८९ अखेर ७९·५३ कोटी रुपये भांडवल गुंतवणुकीचे उ द्योग जिल्ह्यात होते. त्यात एकूण २,५०५ लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता. याच सालात ७३५ लघुउद्योगांची उद्योग केंद्रात नोंदणी झाली असून त्यातून सु. ३,५७५ रोजगारांना काम उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. सांप्रत जिल्ह्यात लातूर, अहमदपूर आणि औसा या तालुक्यात सहकारी तत्वावर चाललेले साखर कारखाने आहेत. लातूर येथील औद्योगिक वसाहतीत तेल गाळण्याचे बरेच कारखाने असून भूईमु गाच्या तेलापासून वनस्पती तूप करण्याचा मोठा कारखाना आहे. याच वसाहतीत हातकागद तयार करण्याचा आणि पोलादाची, पितळी भांडी बनविण्याचे कारखाने आढळतात. लातूर, उदगीर व अहमदपूर येथे कापसाचे कारखाने असून लातूर येथे सूत काढयाचा मोठा कारखाना आहे. तसेच सुती व लोकरी कापड विणण्याचे काम लातूर, औसा, उदगीर व मुरूड येथे चालते. लातूर, उदगीर व लामजना येथे कातडी कमवण्याचा उद्योग असून मोठ्या प्रमाणावर पादत्राणे तयार होतात. यांशिवाय येथे इतर १२७ औद्योगिक संस्था आहेत. लातूर शहर सु. अकरा मार्गांनी सभोवतालच्या शहरांशी जोडले असून नगरपालिका हद्दीतील रस्ते वगळता मार्च १९८८ अखेर जिल्ह्यात ४,०२७·९९ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यात १९८९ मध्ये ४,११९·३६ किमी. नवीन रस्त्यांची भर पडली. राज्यमहामार्ग व प्रमुख जिल्हामार्ग या नावाखाली अनुक्रमे ७६६·६६ व १,२२२·५५ किमी. रस्त्यांचा समावेश होतो. सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते नाहीत परंतु डांबरी व खडीचे रस्ते आहेत. त्यांची लांबी अनुक्रमे १,०७६·३५ व २,४९५·४० किमी. आहे. यांशिवाय रुंद – मापी रेल्वेचा परळी ते विकाराबाद हा ८३ किमी. लांबीचा रेल्वेमार्ग आहे आणि लातूर ते कुर्डुवाडीला जोडणारा अरुंदमापी रेल्वेचा ६५ किमी. लांबीचा मार्ग आहे. १९८९ अखेर जिल्ह्यात एकूण ११,७१५ वाहने होती. त्यांपैकी ६४ टक्के दुचाकी, ६ टक्के ट्रॅक्टर, ११ टक्के सार्वजनिक मालवाहतुकीची, ७ टक्के मोटारी, ६ टक्के रिक्षा, टॅक्सी इ. व ६ टक्के अन्य होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरासरी २५३ बसगाड्या दररोज ३८४ मार्गावर प्रवाशांची ने – आण करतात. १९८९ अखेर जिल्ह्यात २,८५६ दूरध्वनी आणि शासनामार्फत पुरविलेले २०४ दूरदर्शन संच होते .
लातूर जिल्ह्यातील लोक व समाजजीवन
जिल्ह्यातील एकूण लोसंख्येपैकी ८३·५३ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. नागरी भागातील २,१३,०४९ लोकसंख्योपैकी ५२·५६ टक्के लोक लातूर शहरात, २३·७३ टक्के उदगीर व उर्वरित २३·७१ टक्के लोक अहमदपूर, औसा व निलंगा शहरांत राहतात. जिल्ह्यात स्त्री पुरुषांचे नागरी आणि ग्रामीण भागांतील प्रमाण अनुक्रमे १,००० पुरूषांमागे ९७१ व ८९९ होते (१९८९). १९८१ च्या जनगणनेनुसार काम करणा ऱ्यां ची संख्या ४,९०,८८४ होती. याचे प्रमाण एकूण लोकसंख्योच्या ३७.९५ टक्के होते. त्यातील ४१.९२ टक्के शेतकरी, ३७.११ टक्के शेतमजूर आणि १९.३७ टक्के लोक घरगुती उद्योगधंद्यात गुंतलेले होते. त्यांपैकी काहीजण किरकोळ वस्तू बनवितात तसेच दुरुस्तीचे उद्योगधंदे, प्रक्रिया करणे वगैरे उद्योग करतात. यांशिवाय सीमांतिक काम करणा ऱ्यां ची संख्या ८६,९७१ म्हणजे जवळजवळ ६.७२ टक्के आहे. १९८९ या वर्षी जिल्ह्यात पाच तालुक्यांची शहरे आणि ९०४ खेडी होती. सर्व शहरंतून नगरपरिषदा कार्यान्वित असून लातूर नगरपरिषद अ वर्गात, उदगीर नगरपरिषद व वर्गात आणि अहमदपूर, निलंगा व औसा या क वर्गीय नगरपरिषदा आहेत. जिल्ह्यात १९८१ च्या जनगणनेनुसार ३४.६२ टक्के लोक साक्षर होते. ग्रामीण भागात ३१.१८ टक्के, तर शहरी भागात ५१.९९ टक्के साक्षरता आहे. तालुकानिहाय यात विशेष फरक नाही. स्त्री पुरुषांतील साक्षरतेच्या प्रमाणात मोठी तफावत दिसून येते. ते प्रमाण अनुक्रमे २०.५० व ४८.२८ टक्के असे आहे. ग्रामीण भागातील सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण अहमदपूर तालुक्यात आहे व सर्वात कमी प्रमाण औसा तालुक्यात आढळते. नागरी भागात मात्र उदगीर भागातील साक्षरतेचे प्रमाण, विशेषतः पुरुषांचे प्रमाण, ६७·६३ टक्के असून औसा शहरात ते सर्वांत कमी म्हणजे ५८·०५ टक्के आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा खासगी व शासकीय दवाखान्यांद्वारे पुरविल्या जातात. त्यासाठी अकरा रुग्णालये, पंधरा दवाखाने, दहा प्रसूतिगृ हे व ३९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यां तून १९८८ मध्ये २५,००० आंतर रुग्णांवर व १०,७४,००० बाह्य रुग्णांवर उपचार करण्यात आले. साधारणतः जिल्ह्यात एक लाख लोकसंख्येमागे चार वैद्यकीय सेवा संस्था व ४५ खाटांची सोय उपलब्ध आहे. कुटुंब नियोजन कल्याण कार्यक्रमांतर्गत ५४ केंद्राद्वारे १९८८-८९ मध्ये १२,४५७ निर्वीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांमध्ये फक्त ४० पुरुष होते. तांबी बसविलेल्या स्त्रियांची संख्या याच काळात ९,५८८ होती. मार्च १९८९ अखेर जननक्षम दांपत्यांची संख्या २,०६,००४ होती .
शैक्षणिक क्षेत्रात लातूर जिल्हा मराठवाड्यात अग्रेसर असून लातूर शहरात मानवविद्या व शास्त्रतंत्रविद्येची बहुतेक सर्व उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. किंबहुना सर्व प्रकारचे शिक्षण येथे उपलब्ध आहे. जिल्ह्यात १९८८ साली व १,११४ प्राथमिक शाळा, २३३ माध्यमिक विद्यालये, १७ उच्च माध्यमिक विद्यालये आणि १२ महाविद्यालये शास्त्र, कला – वाणिज्य इत्यादिंची होती. यांशिवाय एक विधी महाविद्यालय, तीन अभियांत्रिकी महाविद्यालये, १९ तंत्रनिकेतने, ४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १२ अध्यापन प्रशिक्षण पदविका विद्यालये होती. तंत्रनिकेतनापैकी एक पूर्णत : शासकीय आहे. शासनाने लातूर येथे कृषी विद्यापीठास मान्यता दिली असून त्याची प्राथमिक तयारी १९९० अखेर झाली आहे. जिल्ह्यातील दर एक लाख लोकांमागे ८६ प्राथमिक शाळा आणि १८ माध्यमिक शाळा असे प्रमाण आहे. १९८१ साली जिल्ह्यात ३,५६,४४६ विद्यार्थी शिकत होते. त्यांपैकी ०·१७ टक्के पूर्व – प्राथमिक, ७९·४० टक्के प्राथमिक, १५·१५ टक्के माध्यमिक आणि उरलेले ५.२८ % महाविद्यालयीन विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांपैकी ४१ टक्के मुली असून ४२ टक्के विद्यार्थी मागासवर्गीय गटांतील होते. निरक्षर प्रौढांना साक्षर करण्यासाठी प्रौढ शिक्षण योजनेअंतर्गत १९८८-८९ मध्ये ८०० केंद्रे कार्यरत होती. त्यांतून २४,००० स्त्री पुरुष शिक्षक होते.
लातूर जिल्हा सहकारी क्षेत्रातही पुढारलेला असून जिल्ह्यात विविध प्रकारच्या २,०८६ सहकारी संस्था आहेत. त्यांपैकी प्राथमिक कृषि – पतसंस्थांनी १९८८ -८९ या संदर्भ वर्षात अल्प, मध्यम व दीर्घ मुदतींची सु. ४,००८.६० लाख रुपयांची कर्जे वाटली. त्यांपैकी ३,६७४.४३ लाख निव्वळ पीक कर्जे होती. बिगर कृषी पतसंस्थांमध्ये ३४ नागरी पतपेढ्या व दोन नागरी बँकांचा समावेश होतो. जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांनी १९८८-८९ सालात ४८७ हजार टन उसांचे गाळप केले. त्यातून साखरेचे ५०,५९६ मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ३,२८९ लाख रुपये उत्पन्न मिळाले. जिल्ह्यात १९८९ अखेरीस वर्गीकृत, सहकारी व ग्रामीण बँका यांची संख्या अनुक्रमे ४९, ८९, व ३६ होती. शिवाय जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी भूविकास बँके च्या शाखा असून महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची एक शाखा आहे. जिल्ह्यात स्थायी स्वरुपाची १६ चित्रपटगृहे असून ६ फिरती चित्रपटगृहे आहेत. स्थायी चित्रपटगृहांची आसनक्षमता १५,१०२ आहे. निव्वळ करमणूक करापेटी १९८८-८९ मध्ये ७१,६७,४०१ रुपये महसूल खात्यास मिळाले. मार्च १९८९ अखेरीस जिल्ह्यातून ११७ मराठी दैनिके, १४ साप्ताहिके, दोन मासिके, व एक त्रैमासिक यांचे नियमित प्रकाशन होत असे. याच काळात १२९ मुद्रणालयांची आस्थापना झाली होती.
लातूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे
प्राचीन ऐतिहासिक परंपरा आणि भक्तिमार्गाचा वसा लाभलेल्या लातूर जिल्ह्यात अनेक मंदिरे, दर्गे असून उदगीर व औसा येथील भव्य व प्रशस्त भुईकोंट किल्ले हे प्रवाशांचे आकर्षण आहे. औसाचा किल्ला मलिक अंबरने बांधला असून तो अंबरपूर वा आम्रपूर या नावाने प्रसिद्ध होता. सांप्रत दोन्ही किल्ल्यांची बरीच पडझड झाली असून आतील काही वास्तू जीर्ण अवस्थेत आहेत. औसा किल्ल्याच्या सभोवती खंदक असून दुहेरी तटबंदी आहे आणि त्यावर अर्धवर्तुळाकर भक्कम बुरूज होते. त्यांव र तोफा ठेवीत. अवशिष्ट काही तोफांवर तुर्की अभियंत्यां ची नावे कोरलेली आढळतात. किल्लयात व्रेक्षणीय अशी एकही इमारत नाही तथापि जुन्या इमारतीत काही वर्षे शासकीय कार्यालये होती. किल्ल्याच्या पहारा चौकीतील एका दगडावर नागरी लिपीत मुर्तजा निजामशाह आणि १५२९ साल यांचा उल्लेख आहे मात्र उदगीरचा किल्ला केवळ त्याच्या तटबंदीमुळे एक भव्य वास्तू दिसतो. त्याच्या नजीकच्या लेंडी नदीकाठचा ख्वाजा सादुद्दीन अवलियांचा दर्गा प्रसिद्ध आहे.
खरोसा (औसा तालुका) हे खेडे हिन्दु व बौद्ध गुहांसाठी प्रसिद्ध आहे. या गुहा लातूर – बीदर महामार्गावर लातूरपासून सु. २६ किमी. वर आहेत. यांपैकी महादेव व लकोला या दोन गुहा शिल्पकामासाठी प्रसिद्ध असून येथील शैवशिल्पे उल्ले खनीय आहेत. विधान शिल्पशैली इत्या दींवरून तज्ञांनी यांचे साधर्म्य बा दामी येथील हि दू गुहांशी दर्शविले आहे. त्यांच्या मते त्या सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात केव्हातरी खोदल्या असाव्यात. औसा तालुक्याच्या पश्चिमेला हेरगाव या खेड्यात नामदेव व एकनाथ महाराज यांची मंदिरे व पादुका आहेत. तेथे नामदेव पुण्यतिथी उत्साहाने साजरी होते. औसा गावात वीरनाथ मल्लिनाथ महाराज यांचा मठ असून हे भागवत परंपरा सांभाळणारे लिंगायत पंथीयांचे पूज्य स्थान आहे. तेथे कर्नाटक व मराठवाड्यातून अनेक लिंगायत भक्तगण जमतात. औरंगजेबाने बांधलेली येथील जामा मशीद इस्लाती वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. उजनी (औसा तालुका) येथील संत गणेशनाथ महाराजांची समादी व मठ ख्यातनाम आहेत. तेथे कार्तीक महिन्यात मोठी यात्रा भरते. मातोळा (औसा तालुका) खेड्याजवळ सु. साडेतीन किमी. वर देवनळा येथे अंबाबाईचे प्राचीन मंदिर आहे. लामजना या औसा तालुक्यातील आग्नेयीस १७ किमी. वर वसलेल्या गावात शेख सुलतान व शेख अब्दुल्ला यांचे दर्गे असून त्यांच्या स्मरणार्थ मार्च – एप्रिलदरम्यान मो ठा उरूस भरतो. अहमदपूर येथे अक्कलकोट स्वामींचे गुरू नागेंद्र भारती यांची समाधी एका मठात आहे .
निलंग्यातील नीलकंठेश्व राचे पूर्वामिभुख त्रिकुटेश्वर (तीन गर्भगृहे) मंदिर यादव वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध असून ते माळव्यातील भूमिज या उप – वास्तुशैलीतील बांधलेले आहे. तीन गर्भगृहांव्यतिरीक्त गूढमंडप व आंतरालय यात मंदिर विभागलेले असून त्याचे विधान तारकाकृती आहे. सभामंडपातील सोळा स्तंभ अलंकृत आहेत. सभामंडपात डाव्या बाजूस सप्तमातृकांच्या मूर्ती एकसंध दगडात कोरलेल्या आहेत. त्यांत गणेश व वीरभद्राच्या मूर्तीही आहेत. मुख्य गर्भगृहात स्वयंभू लिगं आहे. उत्तरेकडील गर्भगृहात विष्णू व दक्षिणेकडिल गर्भगृहात हर – गौरी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर देव – देवता, उप – देवता व मिश्र ढंगांतील सुरसुंदरींच्या त्रिभंगातील अनेक सुबकमूर्ती आहेत.
लातूर हे राजधानी चे शहर जिल्ह्यातील महत्वाची व्यापारी पेठ असून देवणी तालुका देखण्या व मजबूत गाई – बैलांसाठी भारतात प्रसिध्द आहे. देवणीला जनावरांचा मोठा बाजार भरतो. तसेच त्याच तालुक्यातील हाळी-हंडरगुळी आणि लातूर तालुक्यातील रेणापूर येथेही जनावरांचा बाजार भरतो. रेणापूरला रेणुकादेवीचे सुंदर देवालय असून मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. तिला धक्का दिला असता ती हलते, हे तिचे वैशिष्ट्य.