आज दिवाळीचा पहिला दिवस; जाणून घ्या वसुबारसचं महत्त्व ?
भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती “वसु – बारस” या दिवसापासून. गाई-गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सण-उत्सवांनी दिवाळी साजरी केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.
कशी करतात वसुबारसची पूजा ?
आपली संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गायींची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
या दिवशी स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी व अन्य पदार्थ गाईला खाऊ घालतात.
गाय ही नंदा कामधेनू असल्याने, धन-धान्य भरपूर येवो, मुलेबाळे सुखी राहोत, यासाठी तिची प्रार्थना करतात. या सायंकाळपासून अंगणात रांगोळी काढण्यास आणि दारात दीप, उजळण्यास सुरुवात करतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो.