दिवाळी खरेदी आणि घ्यावयाची काळजी
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने अनेकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मात्र करोनामुळे यंदाची दिवाळी सुरक्षित वावराच्या नियमांचं पालन करुन साजरी करावी लागणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर जाताना आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी? हे जाणून घेऊयात…
- खरेदीसाठी बाहेर जाताना मास्क सोबत स्वतःचं सॅनिटायझर ठेवा. खरेदीसाठी गेलेल्या दुकानातील सॅनिटायझर न वापरता स्वतःचं सॅनिटायझर वापरा
- कपडे घालून बघण्याचे टाळा. यामुळे संसर्ग टाळता येईल. शक्यतो बॉक्समध्ये बंद असलेले कपडे घ्या, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
- जमल्यास स्वतःच्या वाहनानेच प्रवास करा. बसने प्रवास करणार असाल तर शक्यतो एक सीट सोडून बसा किंवा सुरक्षित अंतर ठेवून उभे राहा.
- विक्रेत्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दालनात ठिकठिकाणी टचलेस सॅनिटायझर मशिन्स, इलेक्ट्रॉनिक सॅनिटायझर मशिन्स उपलब्ध करून द्यावेत. सतत स्पर्श केली जाणारी ठिकाणं सॅनिटायझरने सतत स्वच्छ करावीत. तसेच ग्राहकांना टचलेस आणि कॅशलेस पेमेंटचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत.
- यंदा खरेदीसाठी जाताना लहान मूल, वयोवृद्ध किंवा अस्थमासारखे आजार असणाऱ्या मंडळींना न नेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. घरातील अशा मंडळींची खरेदी घरातील एकाच व्यक्तीनं जाऊन करावी किंवा ऑनलाइन खरेदी करावी.
- गर्दीच्या काळात बाहेर खाणं धोक्याचं ठरेल. अशा वेळी स्वतःजवळ सुका खाऊ आणि पाण्याची बाटली ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. याचबरोबर बाहेरून मिठाई घेताना शक्यतो बॉक्समध्ये पॅक केलेल्या पदार्थांना प्राध्यान्य द्या.
- खरेदीनंतर आधी स्वतः हात-पाय स्वच्छ धुऊन घ्या. आणलेल्या वस्तूचे बॉक्स सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. फराळाच्या पदार्थांची पाकिटं बाहेरून ओल्या कापडाने पुसून घ्या.